मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

दवबिंदू


काही माणसं आयुष्यात दवबिंदुंसारखी भेटतात. एखाद्या थंड प्रसन्न सकाळी हवेतल्या गारव्याच्या प्रेमात पडून हे दवबिंदू आपल्या आयुष्याच्या पानावर अगदी अलगद येऊन बसतात. हवेत आणि त्या दवबिंदुंच्याही आयुष्यात गारवा असेपर्यंत हे दवबिंदू आपल्याशी खेळतात, हितगुज करतात, हसतात, हसवतात, त्यांच्या आणि आपल्या सुख-दु:खांची देवाणघेवाण करतात...आणि मग काही काळाने अचानक... आपल्या आयुष्यात ऊन येतं... त्या उन्हाचे चटके सहन न होऊन ते दवबिंदू आपल्या पानाचा जराही विचार न करता... वाफ होऊन निघून जातात... अगदी निर्दयपणे... पण जाताना त्यांच्या आठवणी मात्र ठिपक्यांच्या वर्तुळांच्या रूपात आपल्या आयुष्याच्या पानावर तशाच ठेऊन जातात... आपल्या आयुष्याचं पान मात्र... उन्हाचे चटके सहन करत प्रतिक्षा करत राहतं... ते दवबिंदू पुन्हा येण्याची... पण... ते काही येत नाहीत...
मग पुन्हा कधीतरी... वाफ झालेल्या त्या दवबिंदुंच्या आयुष्यात पुन्हा एकदा गारवा येतो... आणि मग ते पुन्हा वाफेतून दवबिंदू होऊन अलगद एखाद्या पानावर येऊन बसतात... फरक इतकाच असतो... कि... यावेळी ते कुठल्यातरी दुस-या पानावर बसलेले असतात... आणि आपल्या आयुष्याचं पान मात्र... तोपर्यंत... सुकून गळून पडलेलं असतं... त्या दवबिंदुंच्या प्रतिक्षेत...
-नवज्योत वेल्हाळ